हॅपी डाॅक्टर्स डे चे मेसेजेस आज दिवसभर येत होते.
डाॅक्टरकीला जायचं ठरवल्यापासून हॅपी असल्याचं काही आठवत नाही. आधी अॅडमिशन मिळेल की नाही याचं टेंशन.पहिल्या दिवशी चहा प्यायला हाॅटेलात जाताना कडक इस्त्रीचा अॅप्रन आणि गळ्यात अडकवलेला स्टेथो अशा वेशात आणि आवेशात चालताना
पहिला डे मात्र चांगला गेला.लेक्चरला बसल्यावर वरुन जाणा-या मेट्रोसारखे शब्द डोक्यावरुन जात होते.सुरुवातीला गोंधळलो अडखळलो मग रुळलो काॅलेजात भरपूर खेळलो चेकाळलो बोकाळलो शिक्षकांना सळो की पळो करत वेडेचाळे करत लास्ट डे पर्यंत कधी पोचलो कळलंच नाही.
अजूनही आठवतोय तो प्रॅक्टीसचा फर्स्ट डे ! अभिमान आनंद सारं एका डोळ्यात, पेशंट येईल की नाही याची भिती दुस-या डोळ्यात. डे बाय डे प्रॅक्टीस वाढणार याची खात्री पण साशंक डोळे मात्र पेशंटच्या वाटेकडे ! कधी एखादा माणूस दवाखान्याची पायरी चढायचा आशेला पालवी फुटायची, आलेला माणूस दुसर्या डाॅक्टरचा दवाखाना कुठे आहे विचारुन आल्या पावली परत फिरायचा. पालवी गळून पडायची.सण्डेपासून मण्डेपर्यंतचे दिवस सरकायचे पण मनासारखा डे वाकुल्या दाखवत पुढे पुढे पळायचा.
थोडे बस्तान बसल्यावर मात्र डे कधी उगवायचा कधी मावळायचा कळायचं नाही. धडाधडा वर्षे निघून गेली.कामाच्या रगाड्यात घरातल्यांचे बर्थ डे साजरे करणं सुद्धा जमलं नाही.दवाखान्याचं पारडे यशाकडे झुकत राहिलं. दवाखान्यात शारीरीक वेदना कमी करणा-या गोळ्यांचे डबे खूप होते पण मनावरचं दडपण कमी करणारा डबा शेवटपर्यंत रिकामाच राहिला.
आज डाॅक्टर्स डे म्हणून एका कंपनीनं पेन भेट म्हणून दिले कदाचित डाॅक्टरांना होत असलेल्या पेन्सची त्यांनी दखल घेतली असावी .खरंच डाॅक्टर्स डे साजरा करायचा असेल तर आजाराच्या निमित्ताने नवा दवाखाना थाटलेल्या डाॅक्टरांकडे जा.त्यांचा दवाखाना गर्दीने फुलवा. त्या वेड्यांना खूष करण्याचा हा एकच वे आहे.
डे काय येतील आणि जातील.वे आणि डे एकत्र साजरा करण्यातच खरी मजा आहे.
डाॅ. शाम नाबर,
स्वास्थ्यरंग,
9820010272
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा