स्वास्थ्यरंग........... तना मनाची काळजी घेण्यात दंग

Raigad mahotsav 2016 - साक्ष स्वप्नपूर्तीची - Dr. Tejas Lokhande

रायगड महोत्सव 2016 - साक्ष स्वप्नपूर्तीची
वातावरण निर्मिती चोख होती. स्वराज्याची आठवण करून देईल असं विहंगम दृश्य चोहीकडे दिसत होते. जिजाऊंचा वाडा पाचाड ला सजला होता. राणी महालात सुबक पडदे, मखमली गालीचा,  मऊशार गाद्या अंथरल्या होत्या.
स्वतःचाच हेवा वाटावा असा क्षण भासत होता. आयुष्यात एक दिवस स्वराज्याचा जगायला मिळण हे प्रत्येक शिवभक्ताचं उरी बाळगलेले स्वप्न पूर्ण होताना स्वप्नावस्था प्रतीत होत होती. 
मावळे अवजड शरीरानं युद्ध पातळीवर कसे काम करत असतील हा विचार वेडावून टाकत होता.
रात्री आकाशातून गार वारा आमच्या वर पुर्या ताकदीन फुंकर मारून गार पाडत होता. अंधाराला काळ्या रंगाची धार आली होतीच म्हणून शेवटी पहाटे उजाडल्यावर काम करण्याचा निर्धार केला.
पहाट झाली..
शिव सकाळ झाली....
पवित्र कार्य पार पाडताना पवित्र स्थानी स्नान करणं हे एखाद्या तिर्थक्षेत्र स्नानेतकच पवित्र आणि मंगलकर वाटत होते.
सामान घेऊन थेट नगारखाना गाठला.
सूर्य अजून आळसलेलाच होता. स्वराज्याचा राजा च्या पवित्र चौथर्‍यावर नतमस्तक होऊन महाराजांची आज्ञा घेऊन नमस्कार केला. या पामराला दिलेल्या संधीचे आभार मानले. उदबत्ती लावली आणि आसमंत हा स्वराज्याच्या गंधाने  सुगंधित होऊन गेला. इतक्यात सूर्य ही प्रसन्न होऊ झाला. सूर्याची उर्जा पसरेपर्यंत चंद्राची शितलता अजून निशासम होती. सोसाट्याचा वारा वाहतच होता. नगारखाना मध्ये रंगांच्या पायघड्या सजवल्या घेतल्या पण वारा आमची परीक्षा बघायला उत्साहित होता. पण महाराजांचाच आशीर्वाद आणि श्रींचीच इच्छा म्हणावयाची की चाळणीतून रंगांचा गालीचा पडू लागला अन शुभ्र रांगोळी ची झालर त्या वार्‍यासंग झूलू लागली.
सूर्य वर येताना पूर्वाभीमुख असलेल्या महाराजांची प्रतीमा ही आपलं रूप धारण करू लागली. चेहर्‍यावरचा तेज पाहता साक्षात प्राण प्रतिष्ठित होऊ लागले. कलाकाराने घडवलेल्या तो पाषाण अधिक तेजस्वी दिसत होता. सूर्य किरण सर्वात आधी चरणस्पर्श करून माथ्यावर आसनस्थ झाली. माहोल दैदीप्यमान झाला. चौथर्‍यावर प्रकाश आला तेव्हा तेथील रांगोळी ची सुरूवात केली. रांगोळी रेखाटताना मनावर प्रचंड दडपण आले होते. समोर विराजमान झालेल्या राजा समोर काय करावं हे काही केल्या सुचे ना..
क्षणभर शांत जाहलो, महाराजांकडे भावनेने भरलेल्या डोळ्यांनी नजर दिली,
मनापासून चा प्रयत्न गोड मानून घ्या ही विनवणी केली. माझ्या स्वप्नाची तुम्ही पूर्तता करावी असं साकडे घातले. महाराजांच्या नजरेतून धीर मिळाला.  चाळण उचलली.. आणि भगवा पसरवला. ह्या ऐतिहासिक सोहळ्याला कोणाचीही दृष्ट न लागो म्हणून थोडा काळा बुक्का उधळून दिला. महाराजांची थोरवी गाताना ह्या कलंदर कलाकाराच्या रंगांना जोडली शब्द स्तुती -
" सह्याद्रीच्या कडेकपारीत गुंजते...
इथल्या मातीत रूजतो माझा राजा.
दुष्टांचा संहार करूनी नृसिंह विराजीला
तैसा सिंहासनी शोभतो माझा राजा. "
हवे मुळे रांगोळी टिकणे मुश्किल झाले. . पण युक्ती करून जाड थर देत पूर्ण झाली.  जय भवानी जय शिवाजी चा घोष आपोआपच मनात आला आणि ते पवित्र शब्दसुमन रांगोळीतून अर्पण केले.  मावळ्यांच्या वेषात आलेल्या सेवकांनी तुतारी ने सलामी दिली. . महाराजांच्या चरणांवर चाफा वाहिला.. रांगोळी वर ही अर्पण केला. नमस्कार करून साष्टांग दंडवत घातला.
आपल्यावर विश्वासाने सोपवलेली जबाबदारी पूर्ण झाली याचा आनंद वाटत होता. मन भरून आले होते,  क्षण गोठला होता, मीही स्तब्ध झालो होतो, स्वस्थ झालो. स्वराज्याच्या ह्या सोहळ्याची साक्ष अनुभवताना महाराजांच्या साक्षीने रंगावली रेखाटण्याचे योग साक्षात आला होता. ह्याला भाग्य नाहीतर अजून काय म्हणायचे.  ह्या रायगडाने मला धन्य केले... माझ्या रंगावली ला धन्य केले....आता मात्र कोणतीच अपेक्षा नव्हती. स्वप्नपूर्तीचा चा हा क्षण अगदी अविस्मरणीय ठरणार ह्यात कोणतेच दुमत नाही.
धन्य जाहलो.... !
धन्य जाहलो.... !
डाॅ. तेजस लोखंडे
॥ स्वास्थ्यरंग ॥ - गडभेट
रायगड महोत्सव 2016
9773267001